मुंबई, २९ मार्च २०२५: महाराष्ट्राची ओळख सहिष्णुता, बंधुता आणि समतेसाठी आहे. येथे सण-उत्सव एकोप्याने साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण दूषित झाले असून, त्यामुळे सर्वसामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत नागपुरातील हिंसाचार, कोकणातील अप्रिय घटना आणि अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारांमुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.
महाराष्ट्र धर्म हा फक्त शब्द नाही, तर तो इथल्या लोकजीवनाचा गाभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत सहिष्णुतेचे बीज रोवले. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई आणि चक्रधर यांनी बंधुतेचा संदेश दिला. फुले, शाहू आणि आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी दिलेला मंत्र आजही महत्त्वाचा आहे.
मात्र, काही विघातक शक्ती समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सर्व नागरिकांना शांतता आणि सलोखा टिकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“चला, असहिष्णुतेच्या काळोखात गुढी उभी करूया बंधुतेची, ईद साजरी करूया सलोख्याची! हीच खरी महाराष्ट्र धर्माची परंपरा आहे,” असे आवाहन मान्यवरांनी केले आहे.
या आवाहनाला पाठिंबा देणारे मान्यवर:
- डॉ. तारा भवाळकर, डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. गणेश देवी, डॉ. रावसाहेब कसबे, अब्दुल कादर मुकादम, कपिल पाटील. निखिल वागळे. डॉ. झहीर काझी, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल, अजित शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, राजा कांदळकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल