पुणे, प्रतिनिधी: पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते अशफाक मोमीन यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शिवसेना भवन येथे पार पडला.
या वेळी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या पुढाकाराने अशफाक मोमीन यांच्यावर शिवसेना अल्पसंख्यांक शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नियुक्तीपत्र अजय भोसले यांच्या हस्ते मोमीन यांना देण्यात आले.
अशफाक मोमीन यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील शिवसेनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष रजपूत, उपजिल्हा प्रमुख मनोज खुडे, हवेली तालुका प्रमुख रोहन शिंदे, सचिव गुरुनाथ सुतार यांच्यासह शिवसैनिक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहसंपर्कप्रमुख अजय भोसले म्हणाले, “एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झटत आहेत. पुण्यात शिवसेनेचा जोर वाढत असून आगामी महापालिका व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना दमदार मुसंडी मारेल.”
शिवसेनेत अल्पसंख्यांक समाजाचा सहभाग वाढल्याने संघटनेला नवसंजीवनी मिळाली असून, सर्वांनी पक्ष वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संतोष रजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय कक्ष प्रमुख अजय सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.