दत्तनगर, पुणे (५ जून):
अखिल दत्तनगर परिसरातील बनसोडे कुटुंबाच्या घरात चार दिवसांपूर्वी झालेल्या एलपीजी गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घरसंसार उद्ध्वस्त झाला. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवशंभु प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेशभाई कदम, वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूजचे पुणे जिल्हा प्रमुख व ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे सदस्य विशाल अडागळे यांनी तत्काळ लक्ष घालून मदतीचा पुढाकार घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखिल दत्तनगर मित्र मंडळाचाही या कार्यात मोलाचा सहभाग राहिला.
या संयुक्त प्रयत्नातून उमाशिव भारत गॅस एजन्सी कात्रजच्या संचालिका श्रीमती श्रद्धा शहा यांनी पुढाकार घेत, बनसोडे ताई यांना एक संपूर्ण नवीन गॅस किट – त्यामध्ये गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, रेगुलेटर, गॅस पाईप, लाइटर व नवीन गॅस बुक – ही साहित्ये प्रदान करण्यात आली. ही मदत सध्या प्राथमिक स्वरूपाची असली तरी बनसोडे कुटुंबाला नव्याने उभं राहण्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे.
या उपक्रमामुळे सामाजिक जाणिवा असलेली मंडळी एकत्र आल्यास कोणताही संकटग्रस्त व्यक्ती नव्याने उभा राहू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.