पुणे | प्रतिनिधी:
गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रोडवरील अनधिकृत जडवाहतूक रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षे संघर्ष करून कान्हा हॉटेल चौकात हाईट बॅरियर बसवले होते. मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण हेच हाईट बॅरियर आज सकाळी लावले आणि दुपारी कोणतीही पूर्वसूचना न देता, स्थानिकांना विश्वासात न घेता अचानक काढण्यात आले.
हा प्रकार घडताच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर हा बॅरियर महत्त्वाचा होता, मात्र ट्रान्सपोर्ट लॉबी आणि अनधिकृत गोडाऊनधारकांच्या दबावामुळे प्रशासनाने झुकते माप दिल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्वती विधानसभा उपाध्यक्ष मंगेश प्रकाश जाधव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, “हाईट बॅरियर काढण्यामागे कोणती शक्ती काम करत आहे? जनतेच्या जीवापेक्षा हफ्त्याला महत्त्व देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी रोषपूर्ण मागणी केली आहे.
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याला जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”
स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.